जतन, संवर्धन कामामुळे मंदिरास आले १३ व्या शतकातील स्वरूप



पंढरपूर
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने हाती घेतलेल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिर जतन, संवर्धन कार्यक्रमामुळे मंदिराचे अंतर्बाह्य स्वरूप बदलून गेले आहे..मंदिरास मूळ स्वरूप देण्याचा समितीचा उद्देश सफल झाल्याचे दिसून येत आहे.
श्री विठ्ठल आणि रुक्मिणीचे मुख्य मंदिर (गर्भगृह ) सुमारे १३ व्या शतकातील असल्याचे सांगितले जाते. त्यानंतर काळानुरूप मंदिराचा विस्तार वाढत गेला. इंग्रजपूर्व काळापर्यंत मंदिराचे विविध ताब्यात बांधकाम झाल्याचे संदर्भ मिळत आहेत. मात्र या दरम्यान मंदिराचे मूळ स्वरूप हरवून गेले. मागील चार, पाच दशकात मंदिराची वारंवार रंग रंगोटी केली गेली. गाभाऱ्यात सिमेंट काँक्रीटचे बांधकाम झाले. वातानुकूलित यंत्रणा, ग्रॅनाईट, विद्युतीकरण अशा बदलामुळे मंदिराचे पुरातन स्वरूप हरवून गेले होते. मंदिरातील अनेक भाग जीर्णोद्धारस आलेले होते. ही गरज ओळखून मंदिर समितीने दीड वर्षांपूर्वी मंदिर संवर्धन आणि जीर्णोद्धार कार्यक्रम हाती घेतला. भारतीय पुरातत्त्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली सुमारे ९५ कोटी रुपये खर्चून मंदिराचा जिर्णोद्धार केला गेला.
आज विठ्ठल मंदिरात गेल्यानंतर कोणतेही आधुनिक शैलीतील बांधकाम दिसत नाही. कोरीव नक्षीकाम, मजबूत दगडी शेकडो वर्षांच्या सांस्कृतिक खुणा दाखवणारे मंदिर आतून, बाहेरून दिसून येते. आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर मंदिरात विद्युत रोषणाई केली असली तरी ती रोषणाई सुद्धा मंदिराचे पुरातन स्वरूप दाखवते आहे. यामुळे भाविकांतूनही समाधान व्यक्त होत आहे.

