• Sat. Oct 25th, 2025

आषाढी यात्रा : प्रसादासाठी यंदा १३.५ लाख बुंदी लाडू

Bypandharpurtimes.com

Jun 27, 2025
Spread the love

सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर : १२० कर्मचारी पाकशाळेत कार्यरत : ६० हजार राजगिरा लाडू प्रसाद


पंढरपूर

आषाढ शुध्द एकादशी निमित्त भाविकांना श्रींचा प्रसाद म्हणून मंदिर समिती मार्फत पुरेशा प्रमाणात बुंदी व राजगिरा लाडू प्रसाद उपलब्ध करून देण्यात येत आहे, यासाठी १३ लाख ५० हजार बुंदी लाडू निर्मित करण्यात येत असल्याची माहिती मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.

श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी येणारा प्रत्येक भाविक दर्शन झाल्यानंतर श्रींचा प्रसाद म्हणून बुंदी व राजगिरा लाडू प्रसाद खरेदी करत असतो. मंदिर समितीच्या बुंदी लाडू प्रसादाला भाविकांतून मोठी मागणी होत असते. या प्रत्येक भाविकांना लाडू प्रसाद मिळेल या दृष्टीने १३ लाख ५० हजार बुंदी लाडू प्रसाद व ६० हजार राजगिरा लाडू प्रसाद उपलब्ध करण्यात येत आहे. यामध्ये बुंदी लाडू प्रसाद मंदिर समितीमार्फत व राजगिरा लाडू प्रसाद आऊटसोर्सिंग पद्धतीने खरेदी करण्यात येत आहे. ७० ग्रॅम वजनाचे दोन बुंदी लाडू कागदी पिशवीत पॅकिंग करून प्रति पाकीट २० रुपये प्रमाणे व २५ ग्रॅम वजनाचे दोन राजगिरा लाडू पॅकिंग करून प्रति पाकीट १० रुपये प्रमाणे भाविकांना उपलब्ध करून देण्यात येत आहे. यासाठी पश्चिम द्वार, उत्तर द्वार, श्री संत तुकाराम भवन असे एकूण तीन स्टॉल असून, सर्व स्टॉल २४ तास खुले ठेवण्यात येत आहेत. बुंदी लाडू प्रसाद एमटीडीसी भक्तनिवास येथील लाडू उत्पादन केंद्रामध्ये हरभरा डाळ, साखर, शेंगदाणा डबल रिफाइंड तेल, काजू, बेदाणा, विलायची इत्यादी पदार्था पासून तसेच अन्न व औषध प्रशासनाच्या सर्व नियमांचे पालन करून तयार करण्यात येत असल्याचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी सांगितले.

या लाडू प्रसादाची शासकीय प्रयोगशाळेतून खाण्यास योग्य असल्याबाबत तपासणी करून घेण्यात आली आहे. बुंदी व राजगिरा लाडू प्रसाद व्यवस्थेची जबाबदारी अनुभवी विभाग प्रमुख भिमाशंकर सारवाडकर यांना देण्यात आली आहे, याशिवाय सुमारे १२० कर्मचारी २४ तास परिश्रम घेत आहेत. भाविकांना दिला जाणारा लाडू प्रसाद स्वादिष्ट करतांना आरोग्याच्या दृष्टीनेही सर्व नियम पाळण्यात येत आहेत. प्रसाद पॅकिंग करण्यासाठी पर्यावरण पूरक कागदी पिशवीचा वापर करण्यात येत असल्याचे मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी यावेळी सांगीतले.

बुंदी लाडूप्रसादासाठी सुमारे २५ टन हरभरा दाळ, ३ टन ७५० किलो साखर, १.७ टन शेंगदाणा तेल, ५०० किलो काजू, ३७५ किलो बेदाणा, ३७ किलो विलायची,२ हजार ५०० ग्रॅम केशरी रंगाची खरेदी करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *