
सरपंच सौ सुवर्णा भुसनर यांनी दिली माहिती : महिला भाविकांसाठी चेंजिंग रूम्स, आरोग्य केंद्र, हिरकणी कक्ष तयार : रस्ते दुरुस्ती स्वच्छता पूर्ण
पंढरपूर : पीटी वृत्तसेवा
येत्या ४ जुलै रोजी संत एकनाथ महाराजांचा पालखी सोहळा भीमा नदीच्या पैलतीरी असलेल्या व्होळे गावी येत आहे. यंदा पालखी सोहळ्यासोबत सुमारे ५ हजारावर वारकरी आहेत. या सर्व वारकऱ्यांच्या सेवेसाठी व्होळे ग्रामपंचायतीने जय्यत तयारी केली असून व्होळे ग्रामस्थ संतांच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहेत, अशी माहिती गावच्या लोकनियुक्त सरपंच सौ सुवर्णा भुसनर यांनी दिली.
या संदर्भात अधिक माहिती देताना सरपंच भुसनर यांनी सांगितले कि, श्री संत एकनाथ महाराज यांचा पालखी सोहळा पैठण येथून येत असताना तो व्होळे या गावी ४ जुलै रोजी मुक्कामी येत आहे. यंदा पालखी सोहळ्यासोबत ५ हजार हुन अधिक वारकरी आहेत, असे पालखी सोहळा प्रमुखांनी सांगितले आहे. त्या अनुषंगाने व्होळे ग्रामपंचायतीने तयारी सुरु केली आहे. पालखीचा मुक्काम ग्रामदैवत हनुमान मंदिराजवळ असतो,त्या ठिकाणी पावसाची शक्यता लक्षात घेऊन ५ हजार चौरस फुटांचा वॉटरफ्रुफ मंडप उभा केला आहे. गावाच्या शिवेवर संपूर्ण ग्रामस्थ वाजत गाजत संत एकनाथ महाराजांच्या पालखी सोहळ्याचे स्वागत करणार आहेत. यानंतर सोहळ्यासोबत असणाऱ्या सर्व भाविकांच्या जेवणाची व्यवस्था ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून केलेली आहे.
याशिवाय ग्रामपंचायतीने यात्रा अनुदान आणि स्वनिधीतून गावात आरोग्य कक्ष, हिरकणी कक्ष उभा केलेला आहे.
भीमा नदीकाठी तसेच गावात जिथे स्नानाची व्यवस्था आहे तिथे, महिलांसाठी चेंनिज्ग रूम्स केल्या आहेत. भीमा नदीला वारकरी मोठ्या श्रद्धेने स्नानास जातात, यंदा नदीला पाणी अधिक असल्याने त्यांच्या सुरक्षिततेसाठी २ नावा तयार ठेवल्या जाणार आहेत. नदी पात्रात जिथे पाणी खोल आहे तिथे, भाविकांसाठी सावधानतेचा इशारा देणारे फलक नदी काठी लावण्यात येणार आहेत.
जिल्हा परिषदे या सूचनेनुसार यंदा भाविकांसाठी २ फूट मसाजर मशीन घेतली आहेत. रस्त्यावर दिशा दर्शक बोर्ड लावले आहेत तसेच पालखी मार्ग स्वच्छ करून घेतला आहे, गावातील पालखी तळावरील अतिक्रमणे काढून घेतली आहेत. ५० मोबाईल टॉयलेट, १३०० चौरस फुटांचा वॉटर फ्रुफ मंडप, आर . ओ चा पाणी पुरवठा, गावची दीड लाख लिटर क्षमतेची पाणी पुरवठा टाकी भरून ठेवली आहे. याशिवाय जिल्हा परिषदेकडून पाण्याचे दोन टँकर उपलब्ध करून दिले जाणार आहेत. ग्राम पंचायतीकडून गावात पुरेसा प्रकाश राहावा यासाठी सर्व पथदिवे बसवले आहेत, नदी काठी मर्क्युरी दिवे बसवले जाणार आहेत. ग्रामस्थ भाविकांना मोठ्या श्रद्धेने आपली खाजगी शौचालय उपलब्ध करून देतात. त्यामुळे गावात पालखी सोहळा गेल्यानंतर कसलीही अस्वच्छता राहत नाही, गावातील गवत काढून घेतले आहे. गावातील पाणी साठे ब्लिचिंग पावडर टाकिली आहे, दोन वेळा फोगिंग करून घेतले आहे. चार तारखेला संध्यकाळी सरपंच सौ सुवर्णा युवराज भुसनर यांच्या हस्ते पादुकांचे पूजन, अभिषेक करण्यात येणार आहे. पाच तारखेला भीमा स्नान करून पालखी पुढे कौठाळी मार्गे वाखरी कडे मार्गस्थ होते.